कारंजा तहसिल –
इतिहास, संस्कृती आणि प्रशासनाचा संगम कारंजा तहसिल, जिल्हा वाशिममधील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध प्रशासकीय विभाग आहे. संत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान म्हणून कारंजा हे शहर धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक वारसा जपणारे ठिकाण मानले जाते. ब्रिटिश काळातच कारंजा तहसिलची स्थापना झाली असून, महसूल संकलन, न्यायव्यवस्था आणि स्थानिक प्रशासनासाठी हे केंद्र म्हणून विकसित झाले. भारतातील पहिली कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना 1886 मध्ये झाली, ज्यामुळे कारंजा हे व्यापारी दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठिकाण ठरले. आज कारंजा तहसिलमध्ये 163 महसुली गावे असून 91ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सुमारे 2.13 लाख लोकसंख्या आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित असून, कापूस, सोयाबीन, हरभरा यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. प्रशासनाच्या दृष्टीने, तहसिल कार्यालय हे नागरिकांसाठी विविध शासकीय सेवा, जमीन अभिलेख व्यवस्थापन, आणि योजनांची अंमलबजावणी यासाठी कार्यरत आहे. कारंजा हे आधुनिकतेकडे वाटचाल करत असतानाच आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे शहर आहे.